अलिबाग : समाजकार्यात सातत्याने पुढे असणाऱ्या अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, यांच्यामार्फत महाड व चिपळूण येथील पूरग्रस्त भागातील स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये महाड, पोलादपूर व चिपळूण या ठिकाणी दररोज १५०० हून अधिक सदस्य स्वच्छता करण्यासाठी सरसावले. रायगड जिल्हातील महाड, पोलादपूर व रत्नागिरी जिल्हातील चिपळूण शहरामध्ये महापुराच्या पाण्याचा प्रवाह २० फुटांपेक्षा जास्त आल्याने प्रवाहातील गाळ, चिखल, माती, दगड, झाडे झुडपे, प्राणी व अन्य कचरा, वाहने, घरातील वस्तु, किराणा दुकानातील नाशवंत माल हा वस्तीत व रस्त्यावर पसरलेला आहे. या सर्व वस्तू उचलण्यापासून ते रस्त्यावरती साचलेला गाळ यांची विल्हेवाट लावण्यासाठी पूरग्रस्त भागामध्ये स्वच्छता अभियानाचे नियोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच प्रतिष्ठानचे विश्वस्थ सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या स्वच्छता अभियानासाठी सकाळपासून प्रतिष्ठानचे सदस्य अथक काम करत आहेत. तसेच शहरातील शासकीय कार्यालयेही पूरग्रस्त झाल्याने त्यांमधील गाळ व दस्तऐवज काढण्याकामी प्रतिष्ठानचे हजारो हात एकत्र आले आहेत. या स्वच्छता अभियानाच्यावेळी स्वत:चा जेवणाचा डबा, पाण्याची बाटली तसेच सॅनिटायझर, मास्क याचा योग्य वापर सुरू आहे.
महाड, पोलादपूर, चिपळूणमध्ये स्वच्छता मोहीम, स्वच्छता करण्यासाठी नागरिक सरसावले
Related tags :
Comment here