राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीनं आयोजित केलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. देशभरातल्या १ हजार ८४६ स्टार्टअप्सनी या सप्ताहासाठी नोंदणी केली आहे. त्यात आरोग्यविषयक ३२०, शेतीविषयक २५२, शिक्षणविषयक २३८ अशा विविध क्षेत्रातल्या नवसंकल्पना सादर झाल्या आहेत. कौशल्य विकास आणि रोजगार मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली.
तरुणांमधल्या नवसंकल्पनांना प्रोत्साहन देणन, देशातल्या उद्योजकीय परिसंस्थेला चालना देणं हा या सप्ताह आयोजनामागचा उद्देश आहे. सप्ताहातल्या उत्कृष्ट स्टार्टअप्सना राज्यातल्या विविध शासकीय विभागांमध्ये, त्यांच्या नवसंकल्पनांचा लाभ देण्यासाठी, प्रत्येकी १५ लाख रुपयांच्या कामांचे कार्यादेश दिले जातील, असं त्यांनी सांगितलं.
या सप्ताहात २७ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांकडून अर्ज प्राप्त झाले आहेत. तज्ञांकडून तपासणी झाल्यानंतर १०० अग्रणी स्टार्टअप्सना ९ ते १३ ऑगस्ट दरम्यान सादरीकरणाची संधी मिळेल. कोरोना साथीमुळे सर्व सादरीकरण सत्रे ही ऑनलाईन पद्धतीनं होतील, असं मलिक यांनी सांगितलं.
Comment here