National

राजस्थानपेक्षा उत्तर प्रदेशात पेट्रोल-डिझेल २० रुपयांनी स्वस्त

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती कमी कऱण्यासाठी केंद्र सरकारने दिवाळीच्या आधी मोठा निर्णय़ घेतला. केंद्राने उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर काही राज्यांनी व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे अनेक राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये मोठी घट झाली आहे. उत्तर प्रदेशात पेट्रोल आणि डिझेलचे दर हे १२ रुपयांनी कमी झाले तर राजस्थानमध्ये मात्र अद्यापही दर ११५ रुपयांपर्यंत आहेत. राजस्थानने व्हॅटमध्ये कपात केली नाही. त्यामुळे श्रीगंगानगर इथं लखनऊपेक्षा २० रुपयांनी पेट्रोल महाग मिळत आहे.
दिल्लीत आज पेट्रोलचे दर १०३.९७ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ८६.६७ रुपये प्रति लिटर इतके आहेत. मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये आणि डिझेल ९४.१४ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. चेन्नईत पेट्रोल १०१.४० रुपये दराने तर डिझेल ९१.४३ रुपये दराने विक्री केले जात आहे. कोलकात्यात पेट्रोल १०४.६७ रुपये तर डिझेल ८९.७९ रुपये दराने मिळत आहे.

सर्वात कमी दर चंदिगढमध्ये असून ९४.२३ रुपये दराने पेट्रोल विक्री होत आहे. तसंच डिझेलचे दर ८०.९० रुपये इतके आहेत. उत्तर प्रदेशातही पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी आहेत. पेट्रोल ९५.२८ रुपये दराने तर डिझेल ८६.८० रुपये इतके आहे. सर्वाधिक महाग पेट्रोल आणि डिझेल हे राजस्थानमधील श्रीगंगानगर इथं मिळत आहे. इथे पेट्रोलचे दर ११६.३४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल १००.५३ रुपये प्रति लिटर इतके आहेत.
उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह जवळपास दहा राज्यांनी इंधन तेलावरील मूल्यवर्धीत कर (व्हॅट) कमी केला आहे. यात गोवा, आसाम, गुजरात, त्रिपूरा, मणिपूर, कर्नाटक सरकारने ७ रुपयांची तर उत्तर प्रदेशने ९ आणि हरयाणाने सर्वाधिक १२ रुपयांची कपात केली आहे.

Comment here