Mumbai, 14 June, मुंबई: “महाराष्ट्रात राज्य कारभार चालवण्यासाठी महा विकास आघाडी सरकारमधील (MVA Govt) तिन्ही पक्ष एकत्र आहेत. पण २०२४ सालची विधानसभा आणि लोकसभा निवडणूक आघाडी करुन एकत्र लढवण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही” असे राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) रविवारी स्पष्ट केले. पुढच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी केले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी हे विधान केले. (no decision yet on alliance for assembly LS polls NCP) २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार आकाराला आले. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस दोन्ही पक्ष सहभागी आहेत. “किमान समान कार्यक्रमाच्या धोरणावर महा विकास आघाडी सरकार आकाराला आले असून त्यांनी लोकहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत” असे नवाब मलिक म्हणाले.
“शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी निर्णय असो किंवा कोविड व्यवस्थापन, सामान्य नागरिक सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहे” असा दावा नवाब मलिक यांनी केला. “पुढची निवडणूक आम्ही स्वतंत्रपणे लढवू असे पटोले म्हणाले. संघटनात्मक बांधणी भक्कम करण्याबरोबरच कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी सर्वच पक्षांना काम करावे लागते” असे मलिक यांनी सांगितले.”आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तिन्ही पक्ष एकत्र किंवा स्वतंत्रपणे लढवतील. तीन पैकी दोन पक्षांमध्ये आघाडी होऊ शकते. परिस्थितीनुसार या संदर्भात निर्णय घेतले जातील” असे मलिक यांनी सांगितले. “लोकांच्या हितासाठी तिन्ही पक्ष सरकारमध्ये एकत्र काम करत आहेत आणि २०२४ च्या निवडणुका कशा लढवायच्या त्या बद्दल अजून काही ठरलेले नाही” असे मलिक यांनी स्पष्ट केले.
Comment here