City News

15 दिवसात 6 जणांची निर्घृण हत्या, औरंगाबादमधील तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात ?

औरंगाबाद, 07 जून: मागील काही दिवसांपासून औरंगाबादमध्ये टोळी युद्ध आणि नियोजित हत्येच्या घटनांत चांगलीच वाढ झाली आहे. गेल्या 15 दिवसांत औरंगाबादमध्ये सहा जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेले सर्वजण कोणत्या ना कोणत्या गुन्हेगार क्षेत्राशी निगडीत होते. 21 मे रोजी औरंगाबादमधील वाळूज येथील स्वयंघोषित डॉन असणाऱ्या विशाल उर्फ मड्ड्या किशोर फाटे (Vishal Phate murder) याची भर रस्त्यात दगडाने ठेचून हत्या केली होती. त्यानंतर काल रात्रीही औरंगाबादमध्ये कुख्यात गुंड जमीर खान शब्बीर खान याची धारदार शस्त्राने भोकसून हत्या केली आहे.

मागील काही 15 दिवसांत सहा जणांची निर्घृण हत्या झाल्याने शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्याचबरोबर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. अशा गुन्हेगारांना रोखणं पोलिसांसाठी जिकरीचं काम बनत चाललं आहे. मागील पंधरा दिवसांत वाळूज एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2 खूनाच्या घटना घडल्या आहेत. तर छावणी, सिडको, सिडको एमआयडीसी आणि आता सीटी चौक याठिकाणी प्रत्येक एक हत्येची घटना समोर आली आहे.

संबंधित हत्या झालेले सर्वजण साधारणत: 21 ते 30 या वयोगटातील आहेत. त्यामुळे औरंगाबदमध्ये तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात सापडत असल्याचं चित्र दिसत आहे. संबंधित हत्या एखाद्या परिसरावर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा वैयक्तिक बदला घेण्यासाठी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे औरंगाबाद शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.  वरील सहा गुन्ह्यातील काही आरोपींच्या मुसक्या आवळल्या असल्या तरी वाळूज एमआयडीसी आणि सिडको याठिकाणी झालेल्या दोन हत्येचं गूढ अद्याप उलगडलं नाही. त्यामुळे शहरातील खुनाची मालिका रोखणं आणि गुन्हेगारांना जेरबंद करणं याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे. ताज्या खुनाच्या घटनेत कुख्यात गुंड  जमीर खान शब्बीर खान याची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या पैशाच्या देवाण घेवाणीतून झाली असून मृत गुंडाच्या साडूनेच आपल्या मित्राच्या मदतीने ही हत्या केल्याचं उघड झालं आहे.

 

Comment here