World

लष्करी शस्त्रांत जगातील टॉप 100 मध्ये 3 भारतीय कंपन्यांचा समावेश

लष्करी शस्त्रास्त्रांच्या निर्मितीत भारतही आता झपाट्यानं आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. यामुळेच जगातील टॉप 100 कंपन्यांमध्ये तीन भारतीय कंपन्यांचा समावेश झालाय. भारतीय कंपन्यांनी जगभरात आपला ठसा उमटवलाय. तीन भारतीय लष्करी उपकरणं निर्मात्यांनी शस्त्रं, लष्करी विमानं आणि उपकरणं बनवणाऱ्या टॉप 100 जागतिक कंपन्यांच्या यादीत स्थान मिळवलंय. स्वीडिश थिंक टँक स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (SIPRI) अहवालात याची नोंद घेण्यात आलीय.

मेक इन इंडिया अंतर्गत जगभरातील लष्करी उपकरणं तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये भारताचा दबदबा वाढलाय. यात पहिल्या 100 कंपन्यांमध्ये तीन भारतीय कंपन्या आहेत. स्वीडिश थिंक-टँक स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, हिंदुस्तान एरोनॉटिक्स 42 व्या क्रमांकावर तर भारत इलेक्ट्रॉनिक्स 66 व्या क्रमांकावर आहे. या कंपन्यांच्या शस्त्रास्त्र विक्रीत अनुक्रमे 1.5 टक्के आणि 4 टक्क्यांनी वाढ झालीय.
दरम्यान, 2020 मध्ये भारतीय आयुध कारखान्यांची (60 व्या क्रमांकावर) शस्त्र विक्री किरकोळ म्हणजेच, 0.2 टक्क्यांनी वाढलीय. भारतीय कंपन्यांची एकूण शस्त्र विक्री $6.5 अब्ज (अंदाजे 48,750 कोटी) झालीय. 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये 1.7 टक्क्यांनी वाढ झालीय, असं अहवालात म्हटलंय. एवढंच नाही तर हा आकडा टॉप 100 कंपन्यांच्या एकूण (विक्री) 1.2 टक्के आहे.

अमेरिकेनंतर चीन दुसऱ्या क्रमांकावर
इतर देशांबद्दल बोलायचं झालं तर, शस्त्रं आणि लष्करी उपकरणं बनवण्यात चीन आता अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. रँकिंगमधील (टॉप 100 मध्ये) पाच चिनी कंपन्यांची एकत्रित शस्त्र विक्री 2020 मध्ये $66.8 अब्ज एवढी होती, जी 2019 च्या तुलनेत 1.5 टक्क्यांनी वाढलीय.

Comment here