Women

बामणाचा पत्रा ……ग. दि. माडगूळकर

बामणाचा पत्रा
……ग. दि. माडगूळकर

गावंदरी मळ्यातील आमच्या झोपडीला गावकऱ्यांनी स्वयंत्स्फूर्त नाव दिले आहे- ‘बामणाचा पत्रा’!

गावातील सर्व घरे धाब्याची आहेत. आमच्या या झोपडीच्या माथ्यावरच फक्त पत्रा आहे. वैशिष्टय़ाच्या उल्लेखाने वस्तूची ओळख जलद पटते. माळावरचा ज्ञानोबा, निराचा सोपाना, ढांगुळा सीताराम.. तसाच हा ‘बामणाचा पत्रा’!

आमचा गावंदरीचा मळा ‘पाव’ या नावाने ओळखला जातो. शहरातल्या मुली वेणीला बांधतात तसल्या काळ्या रिबीनसारखी ही एक लांबच लांब जमिनीची पट्टी आहे. लांबी अधिक आहे, रुंदी कमी आहे. मळ्याच्या मधोमध पूर्वाभिमुख बांधलेली एक छोटी पाच खणांची झोपडी आहे. गांधीवधाच्या दंगलीत आमच्या गावातील सर्व ब्राह्मणांची घरे जळाली. गावात नांदायचे तर ती पुन्हा बांधणे आवश्यक वाटले. जाळणाऱ्यांच्याच मदतीने माझ्या धाकटय़ा भावाने आमचे घर पुन्हा बांधले. त्या बांधकामाच्या निमित्ताने बरेच सामान आणले गेले. त्यातल्या उर्वरित सामानातून ही झोपडी उभी राहिली. मूळ बांधताना त्याने हा जनावरांचा गोठा म्हणून बांधला. घरात वर्दळ फार; म्हणून एक साल मी या झोपडीत मुक्काम केला आणि त्या गुरांच्या झोपडीचे मानवी निवासस्थान झाले. १९५० सालच्या जून महिन्यात ‘जनाबाई’ या प्रभातच्या प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शक गोविंदराव घाणेकर विश्रांतीसाठी म्हणून माझ्याबरोबर माडगूळला आले. तीन-चार आठवडे आम्ही त्यावेळी या झोपडीत मुक्काम केला. दळणाऱ्या बायांच्या गीतांनी उजाडणारी येथील सकाळ आणि जनावरांच्या घुंगरनादाने झेपावत येणारी संध्याकाळ आम्हाला अत्यंत रमणीय वाटली. झोपडीतल्या एकांतात आम्ही दोघेच बोलत बसू लागलो. या निर्हेतुक बोलण्यातून पुढे मी लिहिलेल्या ‘पेडगावचे शहाणे’, ‘लाखाची गोष्ट’ या आणि अशा अनेक चित्रपटकथांची बीजे हाती आली. आम्हा दोघांनाही वाटले- ही झोपडी केवळ निवासस्थान नाही, तर स्फूर्तिस्थान आहे. पाठीमागे चालणारी मोटेची घरघर, अवतीभवती प्रत्यक्ष बहरताना दिसणारे हिरवे जीवन.. ईश्वरी निर्मितीचा अद्भुत साक्षात्कारच तिथे होत होता! धान्याच्या बीजाप्रमाणे या भूमीत कथाबीजेदेखील अंकुरित होतील असे आम्हाला वाटले. पुण्याच्या ‘एम्प्रेस गार्डन’कडून आम्ही शेपन्नास रोपे मागवली आणि या झोपडीच्या अवतीभवती ‘वनमहोत्सव’ साजरा करून टाकला. माणदेशाला सदैव घेरून टाकणाऱ्या दुष्काळाने आमची ही हौस मधल्या दुष्काळात लवकरच पार भस्मसात करून टाकली. रातराणी, मधुमालती, गुलाब ही फुलझाडे नामशेष झाली. आंब्याने कधीच मूळ धरले नाही. पेरू फळाला येऊन कोळपले. चिक्कूच्या झाडांना पाणी मुळातच कमी पडले. नाही म्हणायला गुलमोहराच्या आठ-दहा रोपांनी मात्र आपली चिकाटी सोडली नाही. हे गुलमोहराचे वृक्ष आजमितीला तिथे उभे आहेत. त्यांची चैत्रातली रंगपंचमी आम्हाला क्वचित पाहायला मिळते. पण गावात राहणारे माझे पुतणे आपण गुलमोहराच्या फुलांतील खोबरे खाल्ल्याची साक्ष सदैव देतात.

माझ्या येण्याची वार्ता लागताच आमच्या मळ्यावरील महारीण ‘बामणाच्या पत्र्या’खालील जमीन मेंढराच्या हिरव्यागार लिशाने सारवून घेते. मोटर स्टँडवरून आणलेले माझे आणि माझ्या मित्रांचे सामान रामोशाची पोरे व्यवस्थितपणे लावून ठेवतात. आईच्या भेटीनंतर ताबडतोब मी या झोपडीच्या भेटीला येतो.

भर उन्हातदेखील या झोपडीच्या दर्शनाने माझे डोळे थंड होतात. केवळ तीनच बाजूला भिंती असल्यामुळे झोपडीचे स्वरूप एखाद्या धर्मशाळेसारखे दिसते. पाठभिंतीला असलेल्या खुंटय़ावर नाडा, सौंदर, सापत्या इत्यादी शेतीच्या वस्तू लटकत असतात. कोनाडय़ातून बी-बियाणांची गाडगी मृगाची वाट पाहत थांबलेली असतात. मी तिथे गेलो की तिथल्या या वस्तू अदृश्य होतात. खुंटय़ावर कडक इस्त्रीचे सदरे, कोट, जाकिटे लटकू लागतात. कोनाडय़ातल्या बियाणांच्या जागा संदर्भग्रंथ घेतात. गोठा म्हणून बांधलेल्या या जागेवर गादी-तक्क्यांची शुभ्र बैठक ठाण मांडते. तसूतसूने वाढत असलेल्या पिकाला आणि उगवत्या-मावळत्या नारायणाला साक्षी ठेवून मी येथे माझे लेखन सुरू करतो.

झोपडीला दार मुळीच नसल्यामुळे आपण मुक्त आहोत याची सुखद जाण मनात सदैव राहते. अडथळा नसल्यामुळे पहाटेचा गार वारा सरळ अंगावर येतो आणि झोपेतून जागवतो. अंथरुणावर उठून बसले की पूर्वाकाशात प्रकाशत असलेला शुक्र पहिले दर्शन देतो. गावात चाललेल्या जात्यावरील ओव्या झोपलेल्या कवित्वशक्तीला जागे करतात. पहाटे वाऱ्यावर येणारा वाढत्या पिकांचा वास हिरव्या चाफ्याच्या वासासारखा उत्तेजक वाटतो. सारे वातावरणच असे असते, की पुन्हा झोप नको वाटते. अशा वेळी मी एकटाच उठून उभ्या पिकांतून हिंडून येतो. दंवात भिजलेली जोंधळ्याची पाने पायाला लाडिक स्पर्श करतात. ओला हरभरा गमतीदार चावे काढतो, तर करडईची काटेरी झाडे पायावर पांढऱ्या आणि बोचऱ्या रेघोटय़ा मारतात.

झोपडीमागील विहिरीचे पाणी पहाटे पहाटे अगदी गरम असते. झुंजुरकाच्या प्रकाशात त्यातून निघत असलेल्या वाफादेखील नजरेस पडतात. बजरंगाचे नाव घेऊन त्या पाण्यात सुळकांडी मारण्यात जो आनंद असतो तो भोगल्यावाचून कळणार नाही. सुस्नात अवस्थेत परत झोपडीवर येईतोपर्यंत सूर्य उगवून येतो. रानारानांतून शेतकऱ्यांच्या हालचाली सुरू होतात. मी बैठकीवर येतो आणि लिहिण्यास प्रारंभ करतो. एकांताच्या परिणामामुळे असो की बीज अंकुरित करण्याच्या त्या भूमीच्या सामर्थ्यांमुळे असो, डोक्यातल्या कल्पना साकार होण्यासाठी धडपडू लागतात. माझे लेखन सुरू होते. कधी मी स्वत: लिहितो, कधी मी सांगून बरोबरीचा सहकारी ते उतरवून घेतो. लिहिण्याचे वा सांगण्याचे काम एकदा सुरू झाले की मग ते अडखळत नाही. विचारांची चाती फिरत राहते. मेंदू कापसासारखा हलका आणि फुगीर होतो. कथानकाचा पिळदार धागा अतूटपणे निघत राहतो. मध्येच घराकडून न्याहारी येते. त्यात बाजरीची खरपूस भाकरी, लसणीची खमंग चटणी, सायीचे दही अशा खास ग्रामीण वस्तू असतात. त्यांच्या सेवनाने पोट आहारत नाही की कंटाळा आसपास फिरकत नाही. न्याहारीच्या वेळी सोडलेले बैल पुन्हा शिवळ खांद्यावर घेतात तसा मेंदू पुन्हा विचाराखाली मान देतो आणि लिखाणाचे काम निष्ठेने सुरू होते.

झोपडी पूर्वाभिमुख असल्यामुळे सूर्याचा उष्ण उजेड विचारांना आणखीच चैतन्य देतो. अंगाला चटके बसू लागेतोपर्यंत कामाचा वेग उतरत नाही.

दुपार मात्र पोळू लागते. पुन्हा स्नानाची आवश्यकता भासू लागते. सकाळी गरम असलेले विहिरीचे पाणी दुपारी केळीच्या काल्यासारखे थंडगार होते. डोळे तांबडेलाल होईपर्यंत मी त्यात डुंबत राहतो. तंवर घरून जेवणाचे बोलावणे येते. आपल्या स्वत:च्या रानात पिकलेल्या शाळूची पांढरीशुभ्र भाकरी, उसातल्या पालेभाज्या, घरच्या गाई-म्हशींचे दूधदुभते, माणदेशात पिकणाऱ्या गुलाबी तांदळाचा चवदार भात आणि वाढणारी प्रत्यक्ष आई! जगातल्या कुठल्याही पक्वान्नाने होणार नाही एवढी तृप्ती त्या जेवणाने होते. मेंदूतले विचारही हातपाय पसरतात. त्यांना धावपळ नको वाटते. घरात उकाडा होत असतो. रानातला पत्रादेखील यावेळी तव्यासारखा तापतो. पाटाच्या कडेला उभ्या असलेल्या गुलमोहराच्या गार सावलीचे आकर्षण अशा वेळी मला झोपडीपर्यंत जाऊ देत नाही. उजव्या हाताची उशी करून मी मातीतच आडवा होतो. त्या भूमीतली ढेकळे मला रुतत नाहीत. खडे टोचत नाहीत. झोप अगदी गाढ लागते.

चार-साडेचार वाजता उन्हे खाली होतात. कुठूनतरी कुणाला तरी कुणीतरी मारत असलेल्या हाका ऐकू येत असतात. मग आपोआप जाग येते. गावातली माणसे लोंबत्या चंच्या हातात धरून बोलत बोलत झोपडीकडे येतात. गावात घडून गेलेल्या घटनांवर बातचीत करीत ती माणसे झांजड पडेपर्यंत बसून राहतात. पाच-साडेपाच वाजता सूर्य मावळतीला जातो. झांजड पडते. रानातली गुरे परतू लागतात. कुंभाराच्या लिंबावर कावळ्यांचे संमेलन भरते. पांढऱ्या बगळ्यांचा थवा आकाश उल्लंघून जाताना दिसतो. मग मी फिरायला म्हणून उठतो. बोलत बसलेली मंडळीही बरोबर येतात. त्यांच्या सुखदु:खांच्या कहाण्यांतून अनेक कथाबीजे निर्माण होतात. पुढल्या मृगासाठी म्हणून ते बियाणे मी माझ्या डोक्यात साठवून ठेवतो.

किर्र्र रात्र होते. घराघरांतून दिवे लुकलुकू लागतात. तो अंधार भयाण वाटत नाही. शांत, आल्हाददायक वाटतो.

गावातून जेवणखाण आटोपून आठ-साडेआठ वाजता मी पुन्हा झोपडीत येतो. मध्ये पूर्णपणे विसरलेला लिखाणाचा धागा ठरल्यासारखा विनासायास सापडतो. पुन्हा काम सुरू होते.

नित्यनियमाने पत्र्यावर झोपायला येणारी मंडळी घोंगडय़ाच्या खोळी पांघरून बेताबेताने येत राहतात. कंदिलाच्या प्रकाशात माझे लिहिणे अगर सांगणे चालूच असते. त्यांच्या येण्याने त्यात अंतराय येत नाही. ते माझ्याशी काही बोलत नाहीत, मी त्यांच्याशी काही बोलत नाही. झोपडीच्या जोत्याच्या टोकावर ते उगीच घोंगडी पांघरून बसून राहतात. तासा- अर्ध्या तासाने बसल्या जागीच कलंडतात. गाढ झोपी जातात. पुष्कळ वेळ मी, माझे लिखाण, माझा लेखक एवढय़ांचेच अस्तित्व मला भासत राहते. कंदिलावर येणाऱ्या पाखरांची फडफड होते. एक विचार दुसऱ्या विचारांत गुंतताना जणू कडय़ांचा खटका वाजत राहतो.

एखादा महत्त्वाचा भाग आकाराला येतो, डोळे चुरचुरू लागतात, तेव्हा आता झोपावे म्हणून मी अंगाला आळोखेपिळोखे देतो. झोपडीत दहा-वीस गडी अवतीभवती झोपलेले दिसतात. वातावरण अगदी नि:शब्द झालेले असते. गावात गस्त घालणाऱ्या माणसाची एखादी हरळी, कुत्र्यांनी केलेला गलगा एवढाच आवाज आला तर ऐकू येतो. नाहीतर सारे चिडीचिप झालेले असते.

हाती असलेले माझे काम आटोक्यात आले आहे, ही बातमी घरच्या कुणा माणसाकडून गावात फुटते आणि मग एखाद्या दिवशी रात्री लांबून हरळ्या देत बंडाकाका झोपडीवर येतो. बाकीच्या गावकऱ्यांसारखा तो गुपचूप येऊन झोपत नाही; मला तर तो हलवून जागे करतो. बंडाकाकाच्या येण्याने झोपडीतला आनंद अधिकच वाढतो. अर्ध्या रात्रीदेखील त्याच्या कथा सुरू होतात. त्याची सांगण्याची पद्धत इतकी रसाळ असते, की शहरातून आलेली माझी मित्रमंडळी आलोचन जागरण करून त्याच्या कथा ऐकत राहतात.

एखाद्या दिवशी माझा अगदी जुना बालमित्र शेजारच्या आटपाडी गावाहून माझ्या भेटीला येतो. तो स्वत:ची दु:स्थिती कधी सांगत नाही. माझ्या प्रगतीचीच विचारणा करीत राहतो. माझ्या उत्कर्षांचा आनंद त्याच्या डोळ्यांत लुकलुकत राहतो. माझ्यापासून त्याला कसलीही अपेक्षा नसते. आपल्या दरिद्री आयुष्यातील चार दिवस तो माझ्या संगतीत सुखात काढतो. माझा अधिक उत्कर्ष व्हावा असे मनोमन इच्छून एका सकाळी अनवाणी पायांनी निघून जातो. त्याच्या किंवा आणखी कुणाच्याही आगमनाने माझ्या लिहिण्याच्या कामात खंड पडत नाही. शेतकऱ्यांची कामे जितक्या ठरीव पद्धतीने होतात, तितक्याच ठरीव पद्धतीने माझे तिथे लिखाण संपते.

माझे काम संपले हे कळल्यावर मग रानातले गडी हुरडय़ाच्या कणसांना हात घालतात. भल्या सकाळी हुरडा भाजला जातो. हुळा होरपळला जातो. रताळ्याच्या हांडय़ा उकडल्या जातात. शेता-शेतांवरून हुरडय़ासाठी निमंत्रणे येतात. दरवेशांची मुले डफ-तुणतुणे घेऊन हजर होतात. आटपाडीहून ‘किट्सन’ची बत्ती आणवली जाते आणि ‘बामणाच्या पत्र्यात’ दरवेशाच्या पोरांच्या लावण्या रंगतात. त्या लावण्यांचे विषय शृंगारिक नसतात. द्वैत-अद्वैत, माया-ब्रह्म, गीता तत्त्वज्ञान अशा अवघड विषयांना त्या मुखरित करतात.

ठरलेला वेळ संपून जातो आणि मला परत निघण्याची सिद्धता करावी लागते. दरवेळी मला गाव सोडताना भडभडून येते. रानातल्या झोपडीत घेतलेला शांततेचा आनंद आणि तयार झालेली चित्रकथा बरोबर घेऊन मी पुन्हा गजबजलेल्या शहराकडे निघतो. सासरी निघालेल्या लेकीला करून घालतात तशा पाठवणीच्या पाटवडय़ा आणि मुरडीचे कानवले आई मला करून घालते.

शक्य तितक्या लवकरच परत यावे असे ठरवून मी पुन्हा एसटीत बसतो. दरवेळी मला निरोप द्यायला अर्धा गाव कुंभाराच्या लिंबाखाली जमा होतो. मोठय़ा कष्टाने मी गावची शीव ओलांडतो. माझा मुक्काम हलल्यावर रानातल्या झोपडीची अवस्था कापणी झालेल्या रानासारखी होते.

शुभ्र बैठक, इस्त्रीचे कपडे, इंग्रजी-मराठी ग्रंथ, नियतकालिके सारे सारे तिथून नाहीसे होते. काही दिवस वाङ्मयीन निर्मितीकडे कौतुकाने पाहत राहिलेला तो ‘बामणाचा पत्रा’ पुन्हा निसर्गाच्या निर्मितीकडे आपले डोळे वळवतो.

मी शहरात येऊन आपल्या कामाला लागतो. शहरातल्या धबडग्याचा कंटाळा येतो. जीव आंबतो. लिहिणे सुचेनासे होते. समोर असलेल्या कोऱ्या कागदावर अक्षरे उमटत नाहीत. माझ्या झरणीतून अभावितपणे एक रेखाचित्र उतरू लागते. तीन भिंती, वर पत्रा, मागेपुढे गुलमोहराची झाडे, अवतीभवती वाढणारी शेती. ‘बामणाच्या पत्र्या’ची आठवण करीत करीत मी माझ्या प्रतिभाशक्तीला वचने देत राहतो- ‘‘आता वर्ष संपले की पुन्हा जाऊ बामणाच्या पत्र्यावर!’’

सौजन्य:©सुमित्र माडगूळकर,गदिमा.कॉम

Comment here