सारा अली खान ही सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी. दोघांचे जे काही चांगले गुण मग अगदी दिसण्यापासून वागण्यापर्यंतचे ते तिच्यात परफेक्ट मिश्र रुपात उतरले आहेत. सैफ-अमृताचा घटस्फोट झाला तेव्हा सारा अली खान फक्त नऊ वर्षांची होती आणि तिचा धाकटा भाऊ इब्राहिम तर केवळ चार एक वर्षांचा. त्या दोघांना अमृता सिंगनं आपल्या तालमीत एकटीनं वाढवलंय. पण आज ही दोन्ही मुलं समाजात वावरताना आपण पाहतो तेव्हा खरंच मुलांना अनेकदा वडिलांपेक्षा आईचं असणं जास्त गरजेचं का असतं याची जाणीव होते. तर असो,हे सगळं विस्तारित सांगण्याचं कारण यासाठीच की नेहमीच आपल्या आई-वडिलांच्या घटस्फोटाला खूप समजुतदारपणे किंवा मग अगदी सहजपणे घेणारी सारा असं काही बोलून गेली की इतकी वर्ष जे मनात घट्ट बंदिस्त करून ठेवलं होतं ते ओठावर आलं की काय तिच्या असं वाटून राहिलंय. काय म्हणाली सारा?
‘अतरंगी रे’ या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत तिला एक प्रश्न विचारण्यात आला की,’आई-वडिलांच्या छायेत एकत्र जी मुलं वाढत नाहीत त्यांचं विश्व कसं असतं?’ आता ‘अतरंगी रे’ सिनेमात तू जी रिंकू सुर्यवंशीची भूमिका केलीय त्या भूमिकेविषयी विचारलेला हा प्रश्न तुलाही लागू होतो, तू कशी कनेक्ट झालीस रिंकूशी?’ पण समजुतदारपणे बोलत सारानं प्रसंग सावरून नेला खरा पण मनातलं शेवटी ओठांवर आलं. ती म्हणाली, ” ‘अतरंगी रे’ सिनेमातली रिंकू सूर्यवंशी अनाथ आहे. तिचे आई-वडील नाहीत,तिला तिच्या आजीनं वाढवलंय. तसं पाहिलं तर तिचं कुटुंब एकत्र नाहीय. माझंही तसंच काहीसं. आई-वडिल आहेत पण एकत्र नाही. म्हणजे दुरावलेल्या कुटुंबाच्या छायेत मी वाढलेली. पण रिंकू आणि मी सर्वच बाबतीत सारखे नाही. मला एक नाही तर दोन कुटुंबांचं प्रेम मिळालं. त्यामुळे माझ्यावर तशी तक्रार करण्याची वेळ कधी आली नाही”.
”पण हो,रिंकू आणि मी एका बाबतीत सारखे असू शकतो. ती म्हणजे,आमचं कुटुंब एकत्र आमच्या सोबत नसल्यामुळे रिंकुसारखंच माझ्या मनात असुरक्षित भावना लहानपणापासुन आजतागायत आहे. आणि उसनं आत्मविश्वासाचं अवसान आणून मी ती असुरक्षिततेची भावना माझ्या मनातच इतकी वर्ष दडवून ठेवलीय”. आता निश्चितच साराच्या या उत्तराचा अर्थ मात्र असाच होतो की आई-वडिलांच्या वेगळं होण्यामुळेच तिच्या मनात असुरक्षित भावनेची भीती निर्माण झाली आहे,नाही का?
Comment here