औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या काळात झालेला एकूण खर्च, थकीत असलेली देणी याबाबतची माहिती तातडीने द्यावी, असे पत्र महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी भांडार विभागाला दिले आहे. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आरोग्य विभागासाठी दोन आरोग्य वैद्यकीय अधिकारी दिले होते. दरम्यान डॉ. पाडळकर यांचा अतिरिक्त पदभार नुकताच काढण्यात आला आहे. त्यानंतर डॉ. मंडलेचा यांनी आता खर्चाचा हिशेब मागितला आहे.
कोरोना संसर्ग कमी करण्यासोबतच पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांवर उपचार करणे, तसेच रुग्णांना जेवण देणे यासह विविध कामांवर महापालिकेने आत्तापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे. जिल्हा नियोजन समिती व आपत्ती व्यवस्थापनातून महापालिकेला ५५ कोटी रुपये मिळाले आहेत. असे असले तरी महापालिकेने तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडे सुमारे ६६ कोटी रुपयांची मागणी केली आहे. कोरोना काळात काम करणाऱ्या अनेक कंत्राटदारांचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत. दरम्यान आता खर्चाच्या हिशेबावरून महापालिकेत वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Comment here