मुंबई : शैक्षणिक शुल्क माफीसह विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही अनेक महिने उलटले तरी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने अद्याप कार्यवाही न केल्यामुळे संतप्त झालेल्या निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने अखेर आजपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला सकाळी 8 वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. या संपात राज्यातील 5 हजारांहून अधिक डाॅक्टर्स सहभागी झाले आहेत त्यामुळे नक्कीच रुग्ण सेवेवर होण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. मात्र, रुग्णसेवेवर परिणाम होणार नाही याचे आश्वासन डाॅक्टरांकडून देण्यात आले आहे.
निवासी डॉक्टर गेले जवळपास दोन वर्ष कोरोना सेवेमध्ये असल्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवलेला नाही. तेव्हा शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी मार्डतर्फे गेल्या अनेक महिन्यांपासून केली जात आहे.वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत दोन महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीत मंत्री अमित देशमुख यांनीही या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतरही यावर ठोस कार्यवाही विभागाने केलेली नाही. त्यामुळे, अखेर मार्ड डाॅक्टर्स आज सकाळी आठ वाजल्यापासून डॉक्टर संपावर गेले आहेत, तर आपत्कालीन आणि अतिदक्षता विभागातील सेवा सुरू असतील असे मार्डने स्पष्ट केले आहे.
संपाबाबत मार्डची वैद्यकीय संशोधन आणि संचालनालयाच्या संचालकांसोबत सेंट जॉर्ज रुग्णालयात गुरुवारी रात्री उशीरापर्यत बैठक सुरू होती. या बैठकीनंतर पुढील दिशा ठरेल असेही मार्डने सांगितले होते पण, त्यात ही तोडगा निघाला नाही. परिणामी अशा परिस्थितीमध्ये निवासी डॉक्टर संपावर गेल्यास रुग्णसेवेवर नक्कीच परिणाम होण्याची शक्यता आहे.
मार्डच्या प्रतिनिधीसोबत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख चर्चा करणार आहेत. आज सकाळपासून सुरू झालेल्या निवासी डॉक्टरांच्या संपाला मिळणारा पाठींबा पाहता राज्य सरकार निवासी डॉक्टरांच्या मागण्यांवर चर्चा केली जाणार, निवासी डॉक्टर संपावर गेल्याने पडत असलेला रुग्णसेवेवरील ताण पाहता संप मागे घ्यावा, अशी वैद्यकिय शिक्षण विभागाकडून विनंती जोपर्यंत, लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मार्ड डॉक्टर संपावर ठाम आहे.
Comment here