औरंगाबाद: ज्या पक्षात राहतात त्या पक्षातील वरिष्ठांना अडचणीत आणणारा नेता अशी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रतिमा आता शिवसेना नेत्यांनाही अनुभवास येत आहे. सिल्लोड मतदारसंघातील एक लाख शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही अशी तक्रार करत कृषिमंत्री दादा भुसे यांच्या बैठकीत आणि नंतर माध्यमांच्या केंद्रस्थानी आपणच राहू, अशी तजवीज केली. या पूर्वीही कॉंग्रेसमध्ये असताना त्यांनी पक्षाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह तत्कालीन विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखे यांच्यावर टीका केली होती. तसेच कृषी समस्या पुढे करत तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनाही बैठकीत गदारोळ घातला होता. ऐन निवडणुकीच्या काळात कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयातील खुच्र्याही त्यांनी उचलून आणल्या होत्या. स्वपक्षातील नेत्यांना अडचणीत आणण्याच्या प्रकाराची राज्यमंत्री सत्तार यांच्या कार्यशैलीवर आता शिवसेनेत चर्चा सुरू झाली आहे.
राज्यातील पीक विम्याचे गोंधळ नवे नाहीत. भाजप-सेनेची सत्ता असताना शिवसेनेने पीक विम्यासाठी मोर्चा काढला होता. कोविडकाळात पीक विम्याचा विषय काहीसा वळचणीला पडला होता. भाजपचे आमदार प्रशांत बंब वगळता जिल्ह्य़ातील अन्य कोणत्याही भाजपच्या आमदाराने हा प्रश्न ऐरणीवर आणण्यापूर्वी राज्यमंत्री सत्तार यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे तक्रार केली. विमा कंपन्यांनी पाच हजार ८०० कोटी रुपये विमा हप्ता म्हणून गोळा केला आणि विम्यापोटी केवळ एक हजार कोटी रुपये दिले. खरे तर विमा मिळण्यासाठी सरासरी पाच वर्षांची उत्पादकता गृहीत धरणे ही अट अधिक अडचणीची आहे.
मात्र, त्या अटीवर भाष्य न करता पीक विम्यातील गैरव्यवहाराची तक्रार या वर्षी थेट राज्यमंत्र्यांनी केल्याने आता या प्रकरणाला नवे राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे. प्रश्न कोणताही असो, पक्षातील वरिष्ठ नेत्यांना अब्दुल सत्तार यांच्याकडून कोडय़ात टाकले जाते हा अनुभव शिवसेना नेत्यांना आता येऊ लागला आहे. कॉंग्रेसमध्ये जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर निवडणुकीच्या काळात पोस्टर, बॅनर्ससाठी कोणी काही रक्कम देत नाही. कोणी प्रचाराला येत नाही, असे म्हणत तत्कालीन विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरही टीका केली होती. टीका करण्याबरोबर सत्तार यांनी पक्ष बदल करण्यासाठी रात्री- बेरात्री भाजप नेत्यांच्या घेतलेल्या भेटी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केलेले कौतुक, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी डोक्यावरची टोपी न काढण्याची घेतलेली शपथ अशा अनेक बाबी नव्याने चर्चिल्या जात आहेत. वागण्याने आणि बोलण्याने सतत वाद घडविणाऱ्या सत्तार यांनी पीक विम्याच्या मुद्दय़ावर कृषिमंत्र्यांच्याअडचणीत वाढ केली आहे.
कृषी मंत्रालयावर टीका
सत्तार टीका करण्यासाठी मोठे रिंगण आखतात. आतापर्यंत त्यात बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील आदी नेते आले होते. रावसाहेब दानवे यांच्यावर तर ते नेहमीच टीका करतात. अर्जुन खोतकर यांच्या मैत्रीसाठी त्यांनी दानवे यांना पराभूत करण्याची शपथही घेतली होती. कोणत्याही नेत्याविषयी बोलताना ते कधी घसरतील आणि त्याची पातळी कोणती असेल हे सांगता येत नाही. मंत्री असताना कार्यकर्त्यांला मारल्यामुळे त्यांना मंत्रिपद गमवावे लागले होते. त्यानंतरही सतत वादात राहणाऱ्या सत्तार यांनी आता कृषी मंत्रालयावर टीका करायला सुरुवात केली आहे. पीक विम्याच्या निमित्ताने दादा भुसे यांच्याकडे तक्रार करताना त्यांचा सूर पुन्हा चढा झाला.
Comment here