नवी मुंबई : अंमली पदार्थ विक्रीच्या नफ्यातून जास्त हिस्सा घेतल्याने बॉसची हत्या करण्यात आली. तिघांनी आपल्या बॉसला घरात घुसून रॉडने मारुन संपवलं. नवी मुंबईतील वाशी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर तिघांनी पोलिसांना काय सांगायचं, याबद्दल एका मैदानात बसून योजना आखली होती. तिघेही आरोपी पोलिसांना तब्बल 8 तास उलटसुलट जबाब देत होते. मात्र सीसीटीव्ही फूटेज तपासून पोलिसांनी अखेर आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. हत्या करण्यात आलेल्या जेकब क्रिस्तोपा याच्या विरोधातही विविध पोलीस ठाण्यात 15 गुन्हे दाखल होते.
बॉसच्या हत्येचा कट अंमली पदार्थ विक्रीच्या नफ्यातून मिळणाऱ्या रकमेचा ठराविक हिस्सा तिघांना दिल्यानंतर उर्वरित रक्कम जेकब क्रिस्तोपा स्वतःला ठेवायचा. परंतु आपल्यापेक्षा जेकब यालाच अधिक नफा मिळतो, ही गोष्ट तिघांनाही खटकत होती. त्यामुळे तिघांनी आपला बॉस जेकबला मारण्यासाठी कट रचला.
घरात लोखंडी रॉडने मारुन हत्या बॉसच्या घरामध्ये जाऊन त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन हत्या करून तिघे जण पसार झाले होते. हत्या झालेली व्यक्ती सराईत गुन्हेगार असून त्याच्या तीन साथीदारांनी त्याची हत्या केल्याचा सुगावा पोलिसांना मिळाला. त्यामुळे अवघ्या 12 तासात पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणून तिघांना अटक केली आहे.
Comment here