पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात दडी मारून बसलेला पाऊस लवकरच पुनरागमन करणार आहे. येत्या पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस (Rain) पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
नैऋत्येडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे पाऊस पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्येकडील राज्यांकडे सरकरण्याची शक्यता आहे. त्यामुळे 1 जुलैपर्यंत संबंधित राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. यामध्ये महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकचा समावेश आहे. याशिवाय, पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीतही जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसासोबत बर्फवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पाऊस कोठे पडणार?
राजधानी दिल्लीत 2,3 जुलैला पाऊस होऊ शकतो. पुढील काही तासांत सिक्कीम, आसामच्या काही भागात, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मराठवाड्याच्या काही भागात सौम्य आणि मध्यम पावसाची शक्यता आहे.
उत्तराखंडचा काही भाग, बिहारमधील उत्तर भागातील जिल्हे, पश्चिम बंगाल, विदर्भाचा काही भाग, मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप आणि छत्तीसगडचा काही भागात सौम्य ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. झारखंड आणि अंदमान व निकोबार द्वीप समुहात सौम्य आणि काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल.
मुंबईतील धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला
जून महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने ब्रेक घेतला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावात मिळून केवळ 16 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा अधिक आहे. मात्र अद्याप मुंबईत धरणक्षेत्रात पावसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे पाण्याची पातळी अतिशय धिम्या गतीने वाढत आहे. यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिकमध्ये पावसाची दडी, शेतीच्या कामांना ब्रेक
जून महिना संपत आला तरी नाशिक जिल्ह्याकडे (Nashik Rain Update) पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा पावसाच्या प्रतिक्षेत आहे. पावसाने दिलेल्या दडी नंतर शेतीच्या कामांना ही ब्रेक लागण्याची शक्यता आहे. तर जिल्ह्यातील 24 लहान मोठ्या धरणांमध्ये फक्त 27 % पाणीसाठा शिल्लक राहिलाय त्यात नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात फक्त 38% पाणीसाठा शिल्लक राहिल्याने अधिक चिंता वाढलीय. गंगापूर,पालखेड,दारणा,ओझरखेड,भावली,या धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यात पावसाने हजेरी न लावल्यास भीषण पाणी टंचाई ओढवण्याची शक्यता आहे.
Comment here