State News

PM मोदी आज करणार 100 लाख कोटींच्या ‘गतीशक्ती’ योजनेचा शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज13 ऑक्टोबर रोजी पीएम गतीशक्ती योजनेचे अनावरण करणार आहेत. रखडलेल्या प्रकल्पाची मोट बांधण्यासाठी 16 मंत्रालयाची मोट बांधणार आहेत. पीएम गतीशक्ती- या मल्टी मोडल कनेक्टिविटीच्या राष्ट्रीय मास्टर प्लॅनचे सकाळी 11 वाजता उद्‌घाटन करणार आहेत. प्रगती मैदानात नव्या प्रदर्शन संकुलाचे (प्रदर्शन सभागृहे 2 ते 5) देखील पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत. भारतीय व्यापार प्रोत्साहन संघटनेचा प्रमुख उपक्रम असलेला भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा (IITF) 2021चे देखील 14 ते 24 नोव्हेंबर दरम्यान या नव्या प्रदर्शन सभागृहांमध्ये आयोजन होणार आहे. केंद्रीय वाणीज्य, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, रेल्वे, नागरी हवाई वाहतूक, नौवहन, उर्जा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू या खात्याचे मंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित असतील. 2025 पर्यंत उभारल्या जाणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या नियोजनासाठी आराखडा तयार करण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. प्रधानमंत्री गती शक्ती योजनेचे एकूण बजेट 100 लाख कोटी निश्चित करण्यात आले आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस अॅप्लिकेशन्स आणि जिओ-इन्फॉर्मेटिक्सने मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटीसाठी राष्ट्रीय मास्टर प्लॅन तयार केला आहे. ज्यामध्ये देशभरात जीआयएस मॅपिंगचे 200 स्तर आहेत.सर्व पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी प्रकल्पांच्या समग्र नियोजनासाठी सामील होण्यास राज्य सरकारांशी संपर्क साधला जात आहे. योजनेमध्ये 2020-21 पर्यंत बांधलेल्या सर्व प्रकल्पांचा तपशील आहेत. आणि वर्ष 2025 पर्यंत ठरवण्यात आलेल्या 16 विभागांच्या सर्व केंद्रीय प्रकल्पांची माहिती यामध्ये आहे. या वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पीएम गतीशक्ती – राष्ट्रीय मास्टर प्लॅन’ जाहीर केला होता. रेल्वे, रस्ते आणि महामार्ग, पेट्रोलियम आणि वायू, वीज, दूरसंचार, जहाजबांधणी, उड्डाण मंत्रालय आणि उपभोक्ता विभाग यांसारख्या 16 केंद्रीय शासकीय विभागांना एका व्यासपीठावर आणण्याचं काम यामुळे होणार आहे. नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपच्या अंतर्गत हे सर्व विभाग एकमेकांच्या कामांमध्ये सहकार्य पुरवतील. त्यामुळे समग्र नियोजन साध्य करता येईल.पीएम गतीशक्ती सहा स्तंभावर आधारित आहेः

1. सर्वसमावेशकता: हा आराखडा विविध मंत्रालये आणि विभागांचे विद्यमान आणि नियोजित उपक्रम एकाच केंद्रीकृत पोर्टलद्वारे सामावून घेणार आहे. प्रत्येक विभागाला आता एकमेकांचे कामकाज आणि उपक्रम पाहता येणार आहे आणि त्यांना सर्वसमावेशक पद्धतीने नियोजनासाठी आणि प्रकल्पांच्या कार्यान्वयनासाठी महत्त्वाची आकडेवारी आणि माहिती उपलब्ध होणार आहे.

2. प्राधान्यक्रमाची निश्चिती: या आराखड्याद्वारे विविध विभागांना परस्परांशी संवाद साधून आपल्या प्रकल्पांचे प्राधान्यक्रम ठरवता येणार आहेत.

3. सुयोग्य उपयोजन: विविध मंत्रालयांना आपल्या प्रकल्पांमधील त्रुटी दूर करून त्यांचे नियोजन करण्यात हा राष्ट्रीय मास्टर प्लॅन मदत करेल. एका भागातून दुसऱ्या भागात मालवाहतूक करण्यासाठी वेळ आणि पैसा या दोहोंची बचत करणारा सर्वात चांगला मार्ग ठरवण्यासाठी हा आराखडा मदत करेल.

4. तादात्म्य : वेगवेगळी मंत्रालये आणि विभाग बहुतेकदा आपापल्या कक्षांमध्येच राहून काम करत असतात. त्यामुळे नियोजन आणि अंमलबजावणीमधील समन्वयाच्या अभावामुळे प्रकल्पांना विलंब होतो. प्रत्येक विभागाच्या कामांमध्ये त्याचबरोबर शासनाच्या विविध स्तराच्या कामांमध्ये समन्वय साधून तादात्म्य निर्माण करण्याचे काम पीएम गतीशक्ती करेल.

5. विश्लेषणात्मक : जीआयएस आधारित अवकाशीय नियोजन आणि 200 पेक्षा जास्त स्तर असलेली विश्लेषणात्मक साधने यांच्या सहाय्याने हा आराखडा एकाच ठिकाणी सर्व आकडेवारी उपलब्ध करून देईल त्यामुळे काम करणाऱ्या संस्थेसमोर अतिशय सुस्पष्ट चित्र निर्माण होईल.

6. गतीशील : सर्व मंत्रालये आणि विभाग जीआयएस प्लॅटफॉर्मद्वारे आता क्रॉस सेक्टर प्रकल्पांची प्रगती पाहू शकणार आहेत, त्यांचा आढावा घेता येणार आहे आणि त्यावर देखरेख ठेवता येणार आहे. उपग्रहांदवारे मिळालेल्या छायाचित्रांच्या माध्यमातून त्यांना प्रत्यक्ष प्रकल्पस्थळावर होत असलेल्या कामाची प्रगती पाहता येणार आहे आणि नियमितपणे या प्रकल्पांच्या प्रगतीची माहिती पोर्टलवर अद्ययावत केली जाणार आहे. त्यामुळे मास्टर प्लॅन अद्ययावत करणे आणि प्रकल्पांमध्ये महत्त्वाच्या सुधारणा करणे शक्य होणार आहे.

Comment here