Aurangabad, 5 June. Anwar Pathan.
राज्यातील कोरोना लॉकडाऊन अंतर्गतचे निर्बंध शिथिल करणारी नवीन नियमावली राज्य शासनाने जाहीर केली असून आता ही नियमावली सोमवार, ७ जूनपासून लागू होणार आहे. मुख्य सचिव सीताराम कुटे यांनी याबाबतचा आदेश काढला. ३ जून रोजी संपलेल्या आठवड्याच्या सरासरीनुसार भरलेल्या ऑक्सिजन बेडचे प्रमाण आणि पॉझिटिव्हीटी दर या आधारे प्रत्येक जिल्हा प्रशासन नियमावली संदर्भात स्वतंत्र आदेश काढतील, पण या दोन निकषांच्या आधारे नियमावली कशी असेल हे राज्य शासनाने निश्चित केले आहे. प्रत्येक आठवड्यात या दोन निकषांवर जिल्ह्यांची वर्गवारी करून नियमावलीनुसार निर्बंध शिथिल व कडक केले जाणार आहेत. एकूण पाच टप्पे निश्चित करण्यात आले आहेत.ते पुढील प्रमाणे
पाच टप्यात केली अनलॉक ची विभागणी
पहिला टप्पा
पहिल्या टप्प्यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ टक्क्यांहून कमी ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे.
दुसरा टप्पा
दुसऱ्या टप्यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ ते ४० टक्क्यांदरम्यान ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई शहर,
मुंबई उपनगर, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात आहे.
तिसरा टप्पा
तिसऱ्या टप्यात ज्या जिल्ह्यांमध्ये ५ ते १० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ४० टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
चौथा टप्पा
चौथ्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये १० ते २० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ६० टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
पाचवा टप्पा
• पाचव्या गटात ज्या जिल्ह्यांमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आणि ७५ टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. पाचव्या गटात कायम रेड झोन असणार आहे. वरील ४ टप्प्यांमध्ये नसलेल्या सर्व जिल्ह्यांचा समावेश पाचव्या टप्प्यात करण्यात आला आहे.
Comment here